रिक्षाच्या भाड्याचे पैसे नसल्यामुळे चालकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच, पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीवर जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे.
सागर विभीषण बचुटे (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर), विकीकुमार फुलो पासवान (वय २३,) आणि अशोक वीरबहाद्दूर थापा (वय २२, दोघेही रा. फुरसुंगी ) यांना अटक करण्यात आली आहे. सागर हा रिक्षा चालक आहे. तर, इतर दोघे किरकोळ कामे करतात. याबाबत १६ वर्षांच्या एका मुलीने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगी तिच्या मैत्रिणीसह पाच जानेवारी रोजी बुधवार पेठ येथे रिक्षाने येत होती. पण, रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याच्या मजबुरीचा आरोपी सागर याने फायदा घेऊन पीडित मुलीवर रेसकोर्स परिसरातील झाडीमध्ये बलात्कार केला. तसेच, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी आरोपी पासवान व थापा गेले. त्यांनी पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबत दोघींनी हडपसर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करत तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस तपास करत आहेत.
