ठाणे जिल्ह्यातील (Thane) भिवंडी शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील देवनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील देवनगर भागात एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून त्याचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी त्याची आई ही किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तर इतर कुटुंबीय घरात टीव्ही बघत बसले होते. अवघ्या एका वर्षाचा चिमुकला घरात खेळत होता. तो खेळता खेळता बाथरूममध्ये गेला. त्यात पाण्याने भरलेली बादली होती. या बादलीत पडून त्याचा मृत्यू झाला.
भिवंडीच्या देवनगरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. घरातील बाथरूममध्ये बादलीतील पाण्यात खेळत असताना एका वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दिलकौश अन्सारी असे या चिमुकल्याचे नाव आहे. दिलकौश याला सहा भावंडे आहेत. दिलकौश हा सर्वात लहान होता. दिलकौश आपल्या भावंडांसोबत हॉलमध्ये खेळत होता. अचानक तो नजरेसमोरून गायब झाला. त्या दरम्यान दिलकौशची आई शबाना अन्सारी ही स्वयंपाकघरात होती. स्वयंपाक केल्यानंतर ती स्वंयपाकघरातून बाहेर आली. त्यावेळी दिलकौश कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे शबानाने शोधाशोध सुरू केली. दिलकौशला शोधत असताना शबाना बाथरूममध्ये गेली आणि तिथे तिला दिलकौशचा मृतदेह बादलीत आढळला. भावंडांसोबत खेळत असताना पाण्यामध्ये खेळण्यासाठी भावंडांची नजर चुकवून तो बाथरूममध्ये गेला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याची आई शबाना हिच्या फिर्यादीवरून दिलकौशच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, ही घटना घडली कशी, याचा तपास सुरू आहे.
