पत्रकार असल्याची बतावणी करत भामट्याने दोन तरुणांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं!

पत्रकार असल्याची बतावणी करून सरकारी नोकरी लावतो असं आमिष दाखवत दोघांची १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निखिल चंद्रशेखर घोरपडे (रा. हुपरी, ता. हातकणंगले) असं या आरोपीचं नाव असून कोर्टाने त्याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

मूळचा हुपरी येथील निखिल घोरपडे हा दोन वर्षांपूर्वी करवीर तालुक्यातील पाचगाव इथं मनोहर पाटील यांच्याकडे भाड्याने राहत होता. यावेळी निखिल यानं आपण पत्रकार असल्याचं सांगून मनोहर पाटील यांचा विश्वास संपादन केला. आपली मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख आहे. मी तुमच्या मुलाला नोकरी लावतो, असं आमिष दाखवून मनोहर पाटील यांच्याकडून त्याने चार लाख ७६ हजार रुपये घेतले.

पाटील यांच्याप्रमाणेच पिरवाडी इथं राहणाऱ्या शेखर शेळके यांनाही तुमच्या मुलाला रेल्वेत नोकरी नोकरीला लावतो, असं सांगून सुमारे पाच लाख ८९ हजार रुपये घेतले. रोख रक्कम घेतल्यानंतर संशयित घोरपडे याने दोघांना बनावट नियुक्ती पत्र दिले. पण दिलेली नियुक्तीपत्रे बनावट आहेत हे लक्षात आल्यावर पाटील आणि शेळके यांनी करवीर पोलीस ठाण्यात संशयित घोरपडे याच्याविरुद्ध सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली होती.

दरम्यान, शुक्रवारी करवीर पोलिसांनी संशयित निखिल घोरपडे याला ठाणे इथून ताब्यात घेऊन फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केलं असता न्यायालयानं १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *