करोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. ही गोष्ट हेरत शहरातील प्रमुख सिग्नलवर भिकाऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. चिंताजनक बाब म्हणजे लहानग्यांना पुढे पैशांसाठी गळ घातली जात आहे. सिग्नलभोवती भिकाऱ्यांच्या गराड्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
करोना काळात मोठ्या प्रमाणात स्थलांतर, बेरोजगारी आदी कारणांसह प्रशासनाचे ढिम्म धोरण यामुळे भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. यामागे रॅकेट असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यांवर भिकाऱ्यांचा वावर कमी करण्यासाठी पोलिस यंत्रणेपासून प्रशासकीय स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी ‘चाइल्डलाइन’सारख्या सामाजिक संस्थांकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, या उपाययोजनांचा तात्पुरता परिणाम होऊन पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. सन २०१८ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरातील सामाजिक संस्थांच्या मदतीने भिकाऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी गंगाघाट, शहरातील सिग्नल, रस्त्यालगतचे लहान मुले, महिला, वयोवृद्ध भिकाऱ्यांना पोलिस मुख्यालयात आणले. जवळपास १३५ जणांना नवीन कपडे देत सेवाभावी संस्थांकडे सोपवून पुण्यातील पुनर्वसन संस्थेकडे रवाना केले होते. परंतु, काही महिन्यांनंतरच यातील बहुतांश भिकारी हे पुन्हा नाशिकच्या सिग्नलवर, गंगाघाटावर भीक मागताना दिसून आले. चिंताजनक बाब म्हणजे वाहनचालकांकडून पैशांची मागणी करण्यासाठी लहान मुलांना पुढे केले जात आहे.
