देशात आणि राज्यात सातत्याने तापमानात बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस पडत आहे, तर कधी तापमानाच मोठी वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भात तापमानाने टोक गाठलेलं बघायला मिळालं होतं. पण आता विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. फक्त विदर्भच नाही तर राज्यातील 15 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काल वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र बघायला मिळालं होतं. काही ठिकाणी पाऊस देखील पडला होता. यानंतर आज पुन्हा पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. पण कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्नबसमुळे थंड वारे हे भारताच्या दिशेला येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे. पण नंतर पुन्हा तापमानात वाढ होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशात 10 मे नंतर उत्तर पश्चिम भारतात अँटीसायक्लोन निर्माण होणार आहे. यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज आणि उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
