प्रकृती बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल, निलेश लंके यांचं काळजी न करण्याचं आवाहन

अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. १ मे रोजी तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तेथून परत आल्यानंतर काही दिवसांत त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावर त्यांनी अहिल्यानगरमध्ये उपचार घेतले. मात्र फारसा फरक पडला नसल्याने त्यांना पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. फारसे काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, निलेश लंके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. स्वतः खासदार लंके यांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगत कार्यकर्ते आणि नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.

तामिळनाडू येथील जिंजी गडावर 1 मे रोजी आयोजित गड संवर्धन मोहिमेत खासदार निलेश लंके यांनी तब्बल सात ते आठ तास प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यानंतर सततचे दौरे, कार्यक्रम, जनसंपर्कासाठी सुरू असलेली अविरत धावपळ आणि वाढत्या उन्हाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने सुरुवातीला अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्यात आले.

‘काळजी करू नये’, निलेश लंके यांचं आवाहन

दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी स्वतः आपल्या प्रकृतीबाबत प्रतिक्रिया देत समर्थकांना दिलासा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सततचे कार्यक्रम, नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी अविश्रांत धावपळ आणि यावर्षीच्या उन्हाचा कहर यामुळे गेल्या दोन-चार दिवसांपासून मला बरं वाटत नव्हतं. त्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी आज मी रुबी हॉस्पिटल, पुणे येथे दाखल झालो आहे. मात्र माझी तब्येत स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. आपल्या सदिच्छा, शुभेच्छा आणि आशीर्वादाचे बळ माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे काळजी करू नये, मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.

निलेश लंके यांच्या या प्रतिक्रियेनंतर समर्थकांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्याकडे रवाना होताना डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय आणि जनसंपर्कासाठी ओळख असलेले खासदार निलेश लंके अचानक आजारी पडल्याने अहिल्यानगरसह राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *