करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने केंद्र सरकार सतर्क; नव्या लक्षणांसह आठ राज्यांना विशेष सूचना

देशभरात करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पुन्हा एकदा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून चाचणी वाढवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढण्याबरोबरच कोविड-१९ च्या रुग्णसंख्येमध्येही वाढ होत आहे. करोनाचे नवीन प्रकार रोखण्यासाठी संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कांची लवकरात लवकर तपासणी करणे हा मुख्य उपाय आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

देशात करोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता केंद्राने सर्व राज्य सरकारांना विविध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी २४ तास बूथ उभारण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने राज्यांना या बूथवर कोविड-१९ साठी २४ तास जलद अँटीजन टेस्ट सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. तसेच आरोग्य कर्मचार्‍यांना लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी स्वदेशी बनावटीच्या चाचणी किट वापरण्यास प्रोत्साहित केले आहे.

करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. धोका लक्षात घेता सरकारने आठ राज्यांना पत्र लिहून सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड यांना पत्र लिहून त्यांना करोना चाचणी वाढवावी आणि रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करावी, लसीकरणाला गती द्यावी आणि व्याप्ती वाढवावी असा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *