मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणीसाठी आजपासून मराठवाडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री मराठवाड्याकडे रवाना होतील.
मुख्यमंत्री दुपारी 2 वाजता लातुरात आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर शिरुर, अनंतपाळ, निलंगा, आणि औसा तालुक्यातील गावांना भेटी देऊन पिकांची पाहणी करतील आणि चारा छावणी तसंच वनीकरण क्षेत्रास मुख्यमंत्री भेट देणार आहेत. त्यानंतर दिवसभराचा पाहणी दौरा आटोपून मुख्यमंत्री उस्मानाबादेत रात्री आठ वाजता जिल्हा आढावा बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री दौऱ्यावर येणार म्हणून दिखाऊपणा करण्यासाठी उस्मानाबादमध्ये केवळ एक चारा छावणी उभारण्यात आली आहे. विषेश म्हणजे जिल्ह्यात 240 चारा छावण्यांचे प्रस्ताव पाठवले आहेत. तर दुसरीकडे दुष्काळामुळे पोटाची खळगी न भरु शकल्यानं आंभीत महिलेनं स्वतःला पेटवून घेतलं आहे. त्यामुळे खरा दुष्काळ पाहायचा असल्यास मुख्यमंत्र्यांनी आंभीच्या या घरापासून सुरुवात करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

