ब्रिटनमध्ये बुधवारी करोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. करोना महामारी सुरू झाल्यापासून देशातल्या सर्वाधिक रुग्णांची नोंद काल ब्रिटनमध्ये झाली. काल एकाच दिवसात ब्रिटनमध्ये ७८ हजार ६१० रुग्णांची नोंद झाली. या आधीचा उच्चांक जानेवारीमध्ये नोंदवण्यात आला, जेव्हा एकाच दिवसात १० हजार रुग्णांची नोंद झाली होती. पुढील काही दिवसांत करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते, असं एका वरिष्ठ ब्रिटीश आरोग्य प्रमुखाने सांगितलं.
सुमारे ६७ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या ब्रिटनमध्ये आता ११ दशलक्षाहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संक्रमणाची लाट आल्याचा इशारा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे. तथापि, मंगळवारी जेव्हा १०० हून अधिक खासदारांनी या रोगाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या विरोधात मतदान केले तेव्हा त्यांना त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातल्या सर्वात मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागल्याने त्यांच्या अधिकाराला धक्का बसला.
