प्रेयसीच्या पतीला पाहताच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याने २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयपूरमध्ये ही घटना घडली आहे. मोहसीन असं या तरुणाचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन एका विवाहित महिलेसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. प्रताप नगर पोलीस स्टेशनअंतर्गंत एका भाड्याच्या खोलीत तो महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीसोबत राहत होता.
दोन वर्षांपूर्वी महिला नैनीतालमधून मोहसीनसोबत पळून आली होती. यानंतर तिचा पती शोध घेत होता. यादरम्यान त्याला ती जयपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली असं पोलिसांनी सांगितलं आहे.रविवारी महिलेता पती त्यांच्या घरी पोहोचला. यावेळी त्याला पाहताच मोहसीन घाबरला आणि इमारतीच्या बाल्कनीमधून खाली उडी मारली. महिलेने त्याला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. पण सोमवारी त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान महिला आणि तिचा पती सध्या बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. मोहसीनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.