अभिनेता सलमान खान याला देण्यात आलेला जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
मुंबईत वांद्रे येथे 13 वर्षांपूर्वी झालेल्या ‘हिट ऍण्ड रन‘ प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरविलेला सलमान खान याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार रविंद्र पाटील यांच्या आईने ही याचिका दाखल केली होती.
दारूच्या नशेत गाडी चालवून केलेल्या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला, तसेच चार जण जखमी झाले, असा आरोप सलमानवर ठेवण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सलमानला दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
अपघाताच्या वेळी सलमान खान गाडी चालवत नव्हता, असा बचाव त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला होता. सरकारी पक्षाने साक्षीदारांना हजर करण्यात पक्षपात केला आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.

