चंद्रपूर शहरात एका चोरीचा विचित्र प्रकार उघड आला आहे. एका चोरट्याने मोबाईल शॉपीत चोरी करून काऊंटरवरील डायरीत आपण नऊ मोबाईल नेत असल्याची नोंद केली आहे.
शहरातील बागला चौकात असलेल्या ‘अंधारा मोबाईल शॉपी’मध्ये हा प्रकार घडला.
या दुकानात बुधवारी रात्री छताला भगदाड पाडून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी खोके फोडून, कॅश काऊण्टर तोडून, मोबाईल आणि काही रक्कम लांबवली. मात्र सकाळी जेव्हा ही चोरी उघडकीस आली, तेव्हा पोलिसांना धक्काच बसला.
या दुकानाच्या काऊण्टरवरील डायरीवर, आपण ९ मोबाईल नेत असल्याची नोंद चोरट्यांनी करून ठेवल्याचे लक्षात आले. कदाचित आपण केलेल्या चोरीपेक्षा जास्तीच्या मालाचे बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये, म्हणून चोराने ही शक्कल लढवल्याची चर्चा सध्या चंद्रपुरात रंगली आहे.

