स्वाईन फ्लूचे राज्यात ८ महिन्यांत ६१३ तर मुंबईत ५९ मृत्यू

स्वाईन फ्लूचे राज्यात ८ महिन्यांत ६१३ तर मुंबईत ५९ मृत्यू

अवकाळी पावसामुळे राज्यात स्वाईन फ्लूने मोठे थैमान घातले आहे. गेल्या चोवीस तासात ११३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांचा आकडा ६१३ वर पोहोचला आहे. दरम्यान, मुंबईत आजारामुळे गेल्या आठ महिन्यांत ५९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीपासून स्वाईन फ्लूने मुंबईमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबईत तीन दिवसांत या आजाराचे ८२ रुग्ण आढळले होते. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ महिन्यांत अतिशय झपाटय़ाने पसरणा-या या स्वाईन फ्लूमुळे मुंबईत २,५९८ रुग्णांची नोंद झाली. तर केवळ ऑगस्टमध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या ४६८ वर पोहोचली आहे. नागपूरमध्येही स्वाईन फ्लू वेगाने पसरत आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत ७० जणांचा मृत्यू झाला असून पुण्यात ५० तर नाशिकमध्ये ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ९,४९,६५८ रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी स्वाईन फ्लूची शक्यता असलेल्या ६२,०६० रुग्णांना अ‍ॅसेलटॅमीवीर औषध देण्यात आले आहे. तर राज्यात ६ हजार ५५६ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे आढळले. यापैकी ५,६२० जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे. दरम्यान, २५ जण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यसेवा सहसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. याशिवाय, बुधवारी राज्यात या आजाराचे ४,२७५ रुग्ण आढळले.

गुरुवारी दिवसभरात स्वाईन फ्लूच्या ७,१७२ रुग्णांची तपासणी केली, २४१ संशयित रुग्णांना अ‍ॅसेलटॅमीवीर औषध सुरू केले. सध्या राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे २९० रुग्ण उपचार घेत आहेत. तर ९६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. राज्यभरात मृतांचा आकडा ६१३ वर पोहोचला असून यातील ३३ जण राज्याबाहेरील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *