पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधींचे उल्लंघन करत नागरी वस्त्या आणि भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. आर.एस.पुरा सेक्टर भागातील नागरी वस्त्या तसेच चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले.
या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले तर १६ जण जखमी झाले. पाकिस्तानी सैन्याने आर.एस.पुरा आणि अर्णिया सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला. सुरुवातीला त्यांनी लहान शस्त्रात्रांच्या सहाय्याने हल्ला चढविला त्यानंतर मॉर्टर बॉम्बचा माराही केल्याचे बीएसएफ प्रवक्त्यांनी सांगितले.
मध्यरात्री पावणेदोन वाजल्यापासून आंतरराष्ट्रीय सीमेजवळील किशनपूर, जोरा फॉर्म, जुगनू चक, नवापिंड, हर्णा, सिया, अब्दुलियन आणि चंदू चाक भागात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार तसेच तोफांचा मारा सुरु होता.
यामध्ये दोन नागरिक ठार झाले तर १६ जण जखमी झाले. तसेच जखमी झालेल्यांमध्ये आणखी एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्य्याचे जम्मूचे उपायुक्त सिमनरदीप सिंग यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या या हल्ल्यास भारतीय जवानांकडूही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा या भागात गोळीबार सुरु होता.
ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानकडून ५१ वेळा तर तर या वर्षात आतापर्यंत २४५ वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन झाले.
