सीएनजी, पाइप गॅस दरांत वाढ

पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडाल्याने आधीच त्रस्त असलेल्या जनतेला आता वाहनांसाठी आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूची दरवाढ सहन करावी लागणार आहे. मुंबईत महानगर गॅसने कॉप्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)च्या दरात प्रतीकिलो २.५८ रुपयांनी वाढ केली आहे. तर घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या (पीएनजी) किमतीत प्रती घनमीटर (एससीएम) ०.५५ पैशांची वाढ केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे.

करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे नागरिकांचे उत्पन्न घटले आहे, तर अनेकांचा रोजगार बुडाला आहे. त्यातच आता महानगर गॅसनेही सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे या निर्णयावर नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांचा ओढा सीएनजीवर चालणारी मोटार खरेदी करण्याकडे असतो. मात्र, आता मुंबईत नवीन दरानुसार सीएनजी गॅससाठी प्रतीकिलो ५१.९८ रुपये मोजावे लागणार आहेत.

घरगुती गॅससाठी पहिल्या स्तरातील (०.६ घनमीटर प्रतीदिन वापर) ग्राहकांना प्रती घनमीटर गॅसकरिता ३०.४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर दुसऱ्या स्तरातील (०.६ ते १.५ घनमीटर प्रतीदिन वापर) घनमीटर वापर करणाऱ्या ग्राहकांना ३६ रुपये मोजावे लागतील, असे महानगर गॅसकडून सांगण्यात आले. गॅसच्या वाहतूक खर्चात वाढ झाल्याने, तसेच परिचालन खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ करत असल्याचे महानगर गॅसकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *