कांदा दणाणला : महिलांचा मंत्रालयावर मोर्चा

कांदा दणाणला : महिलांचा मंत्रालयावर मोर्चा

प्रति किलो ८० रुपये विक्रमी भाव गाठणा-या कांद्याने सध्या सर्वसामान्यांच्या डोळय़ांत पाणी आणले आहे. भाज्या, कडधान्ये आणि इतर जीवनावश्यक वस्तूंपासून महागाईचा आगडोंब उसळला असताना केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार ढिम्म आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या रणरागिणींनी चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालायावर धडक दिली. सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनकर्त्यां महिलांनी यावेळी कांद्याचे पोते आणले होते. मात्र पोलिसांनी ते काढून घेतले.

यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करून हेच का तुमचे अच्छे दिन, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी केला. कांदा, डाळीसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनत चालले आहे. वाढलेले हे भाव नियंत्रणात आणण्यात फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरल्याने महिलांनी सरकारविरोधात रण छेडले आहे. सोमवारी होणा-या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आंदोलनाची कुणकुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला लागल्याने हे आंदोलन होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांच्यासह अनेक महिलांनी फडणवीस सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला.

संध्या कांदा प्रति किलो ८० रुपये असा भाव खात आहे. डाळीने तर शंभरी गाठली आहे. सर्वसामान्य माणूस महागाईमुळे पुरता होरपळून गेला आहे.  हे सरकार गरिबांचे नसून व्यापारी व दलालांचे आहे. त्यामुळे महागाईवर नियंत्रण आणण्यात सरकारला रस नसल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यां महिलांनी केला. या आंदोलनात उमा भास्करन, वंदना माने, सोनल पेडणेकर, मनीषा गांगण, शीतल कदम, तारा मालवणकर, कामिनी जाधव, फहमिदा खान व सुनीता कॅ्रस्टो यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *