मुंबईत स्वाईन फ्लूच्या मृत्यूचा आकडा वाढतोय!

मुंबईत स्वाईन फ्लूमुळे आणखीन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत मुंबईत ४२ जणांना प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभरात स्वाईन फ्लूचे ३२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईत २,५४८ तर बाहेरून मुंबईत उपचारांसाठी आलेल्या ३९५ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत मुंबईत ४२ तर मुंबईत बाहेरून उपचारांसाठी आलेल्या ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दिवसभरात मुंबईत ३२ तर बाहेरील आठ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, विशेषत: गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे या आजारावर मात करण्यासाठी पालिकेने ६-७ महिन्यांच्या गर्भवती महिलांसाठी तीन प्रसूतिगृहात स्वाईन फ्लूची मोफत लस सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १५३ गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूची लस देण्यात आली आहे.

तसेच लेप्टो आणि स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या कर्मचा-यांकडून झोपडपट्टय़ांमधील ७९१ घरांमध्ये जाऊन ३,४१२ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यातील तापाच्या २८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *