कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या दूरध्वनीवरील संभाषणावरून तो पाकिस्तानमध्येच असल्याचे उघड होत आहे. दाऊदचे तीन ‘फोन कॉल्स‘ गुप्तचर विभागाच्या हाती लागले असून, त्याच्या संभाषणावरून तो पाकमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानमध्ये दाऊद नसल्याचा कांगावा पाक सरकार करत असले तरी तो तेथेच असल्याची माहिती हाती आली आहे. दाऊदला लवकरच भारत सरकार लवकरच पकडेल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले आहे.
दाऊदने त्याचा खास माणूस जावेदशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. भारत, दुबईमधील व्यवहार जावेद पाहात आहे. दाऊद जावेदशिवाय तारिकच्याही संपर्कात असून, केवळ व्यवसायासंदर्भात दूरध्वनीवरून चर्चा करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, दाऊद इब्राहिम, दहशतवादी हाफिज सईद आणि झकीउर रेहमान लख्वी यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे. 1993 मध्ये झालेल्या बॉंबहल्ल्यातील आरोपी दाऊद हा सध्या पाकिस्तानात असल्याचे भारताने नमूद केले आहे. मात्र, इस्लामाबादने हे सत्य नसल्याचे म्हटले आहे, तर सईद हा सध्या पाकिस्तान मोकाट फिरत आहे, तर लख्वीची गेल्या महिन्यातच तुरुंगातून सुटका झाली आहे. या दोघांचा भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात आहे.

