माओवाद्यांच्या एका महिला कमांडरला ठार केल्यानंतर संतप्त माओवाद्यांनी बिहार राज्यातील गया जिल्ह्यामधून जाणाऱ्या प्रसिद्ध ग्रॅंड ट्रंक मार्गावरील किमान 30 ट्रक जाळले. गयामध्ये गेल्या आठवड्यामध्ये सहा माओवाद्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ माओवाद्यांनी या भागामध्ये दोन दिवसांचा बंद पुकारला होता.
ठार करण्यात आलेल्या महिला कमांडरसाठी 15 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. याशिवाय, अटक करण्यात आलेल्यांपैकी माओवाद्यांच्या मगध भागामधील सचिव उपेंद्र बैठा उर्फ संजीवन याचाही समावेश असल्याचे गया पोलिसांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी गया जिल्ह्यामधील अमास भागामध्ये जाळपोळ केली. या भागामध्ये माओवाद्यांनी पुकारलेल्या बंदामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व उपाययोजना केली जात असल्याचे गयाचे पोलिस प्रमुख मनु महाराज यांनी सांगितले.