कोरोनाचा देशात हाहाकार दिसून येत आहे. कोरोना त्सुनामीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पहिल्यांदा एका दिवसात 2 हजाराहून अधिक लोक मरण (Covid-19 Death) पावले आहेत. यामुळे मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला घराबाहेर पडू नका, नियम पाळा, असे आवाहन केले आहे. त्याचवेळी लॉडकडाऊनचे संकेत दिले आहेत. तर महाराष्ट्रातही कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढल्याने आज रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या जास्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. औषधाबरोबर बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे.
भारतात कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे आणि नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, भारतात कोविड -19मधील मृत्यूमुळे (Covid-19 Death)आतापर्यंतच्या सर्व विक्रम मागे पडले आहेत आणि नवीन कोरोना बाधितांचा आकडा जवळपास तीन लाखांच्या घरात पोहोचला आहे. कोरोना साथीच्या रोगाच्या प्रारंभापासून एका दिवसात प्रथमच 2 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
