निशान्तकुमार या १४ वर्षांच्या मुलाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली होती. इतक्या कमी वयात मुलाला हा आजार झाल्याने काय करावे, हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर होता. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकच उपाय त्यांच्यासमोर उरल्यानंतर त्याच्या आईचे मूत्रपिंड त्याच्यासाठी योग्य ठरत असल्याचे स्पष्ट झाले. अखेरीस या मातेने आपल्या मुलास मूत्रपिंड दिले. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. आता या दोघांचीही प्रकृती ठीक आहे.
अपोलो रुग्णालयात डॉ. अमोल पाटील, डॉ. रवींद्र निकाळजे आणि डॉ. अमित लगोटे यांच्या पथकाने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. हे कुटुंबीय मूळचे झारखंड येथील असून आपल्या नातेवाईकांच्या ओळखीने ते इथे मुलाच्या उपचारासाठी आले होते. माझ्या मुलाला किडनी विकार असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही हादरून गेलो होतो. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी मी योग्य असल्याचे माझ्या लक्षात आल्यावर मी लगेच होकार दिला. ९ महिने पोटात वाढवलेल्या मुलाला अशा स्थितीत पाहणे माझ्यासाठी क्लेशकारक होते. मात्र आता त्याला आमच्यासारखेच झालेले पाहून मला झालेला आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी गुंजनकुमार यांनी दिली.