शहापूर, कर्जत, कसारा आणि सातारा या भागांत भूखंड आणि घरांमध्ये (सेकंड होम) गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दिशा डायरेक्ट मार्केटिंग सव्र्हिसेस प्रा. लि. या कंपनीचा संचालक संतोष नाईक याला ठाणे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याने आतापर्यंत २५ जणांची ३ कोटी १५ लाख ५४ हजार ९०९ रुपयांची फसवणूक केली आहे. संतोष याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणात फसवणूक झालेल्या आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या प्रकल्पात १२ ते १५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात दिशा डायरेक्ट मार्केटिंग सव्र्हिसेस प्रा. लि. या कंपनीचे कार्यालय आहे. २०१० ते २०१६ या कालावधीत या कंपनीने शहापूर, कर्जत, कसारा आणि सातारा परिसरांत निसर्गरम्य ठिकाणी भूखंड आणि घरांचे प्रकल्प सुरू असल्याचे भासविले. तसेच यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर दोन वर्षांनी गुंतवणूकदाराला भूखंड किंवा घर नको असल्यास गुंतवणूक केलेल्या रकमेच्या आणखी अर्धी रक्कम परत केली जाईल किंवा भूखंड, घर पाहिजे असल्यास दोन वर्षांनंतर रीतसर सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवून जागा गुंतवणूकदाराच्या नावे केली जाईल, असे प्रलोभन दाखविले होते. या प्रलोभनाला ठाणे, मुंबई परिसरातील अनेक नागरिक बळी पडले होते. अनेकांनी १२ ते १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. यामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना भूखंड किंवा घरे दिली जात नव्हती. अखेर याप्रकरणी गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात २५ गुंतवणूकदारांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.