ठाणे शहरातील हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित केल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. ठाण्यात लॉकडॉउन नसून कन्टेनमेंट झोन प्रतिबंध आदेश असल्याने इतरत्र जनजीवन सुरळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन ठाणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.
सोमवारच्या आदेशानंतर शहरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ठाणेकर नागरिक आणि विरोधकांनीही याबाबत संताप व्यक्त केला. राज्यशासनाकडून याची गंभीर दाखल घेण्यात आल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी सुधारित आदेश जाहीर केले. महापालिकेला लॉकडाउन शब्द वापरून झालेल्या चुकीची कबुली देणे भाग पडले व त्यात दुरुस्ती करून सुधारित आदेश काढावे लागले. राज्य सरकारने महापालिकेचे याविषयी कान उपटल्याचे समजते. ठाणे महापालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाउन करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण ठाणे महापालिकेकडून देण्यात आले आहे.
सध्या महापालिका क्षेत्रात करोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात करोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॉटस्पॉट निर्मिती करण्यात आली आहे. या हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. या क्षेत्रांमध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. करोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला या ठिकाणी ३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते त्यानुसार सुरू राहतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाउन करण्यात आला नसून ज्या आस्थापना सुरू आहेत, त्या यापुढेही सुरु राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच नागरिकांनी सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.