शहरात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. झोपेत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीच्या अंथरुणात विषारी साप घुसला. सापाने मुलीला दंश केल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कर्णपुरा परिसरात घडली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
वैष्णवी अखिलेश पवार, वय 13 राहणार कर्णपुरा असं सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही कुटुंबासह कर्णपुरा येथे राहते. ती आठवीच्या वर्गात शिक्षण घेते. वैष्णवीचे वडील बांधकाम कामगार असून त्यांच्यावर कुटुंब अवलंबून आहे. तर आई घरकाम करते. दरम्यान रात्रीच्या वैष्णवीने कुटुंबासोबत जेवण केलं. घरच्यांशी गप्पा मारल्यानंतर सर्वजण झोपी गेले. मध्यरात्री वैष्णवी गाढ झोपेत असताना तिच्या अंथरुणात विषारी साप शिरला.
वैष्णवीने हालचाल केल्यानंतर सापाने तिला दंश केला. साप विषारी असल्याने वैष्णवी बेशुद्ध झाली. हा संपूर्ण प्रकार वैष्णवीचे वडील अखिलेश यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वैष्णवीला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासून वैष्णवीला मृत घोषित केलं. या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरातील नागरिकांनी देखील या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे.
पावसाळा सुरू असल्यामुळे या दिवसांमध्ये साप बाहेर पडतात. त्यामुळे नागरिकांनी घरात स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर दरवाज्याच्या फटीतून साप येणार नाही यासाठी कापड लावून ठेवावं, जेणेकरून साप आत येणार नाही, असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे.
दरम्यान, याआधीही एका १७ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हा बारावीचा विद्यार्थी मध्यरात्री झोपलेला असताना त्याच्या हाताला काहीतरी चावल्याचा भास झाला, पण त्याला अंधारात उंदिर चावला असेल असं वाटलं आणि चावल्याकडे दुर्लक्ष केलं. पण साप होता आणि उपचारासाठी उशीर झाल्याने तरुणाने जीव गमावला.