पश्चिम घाटमाथ्यावर आभाळ फाटलं, कोयना धरणाचे दरवाजे 9 फुटांवर, सांगलीकरांवर महापुराची टांगती तलवार

पश्चिम घाटमाथ्यावर सोमवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे 9 फुटांनी उघडण्यात आले आहेत. धरणातील पाणीसाठा 99 टीएमसी झाल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना आणि कृष्णा नदीकाठी महापुराचे संकट निर्माण झाले आहे. पाऊस आणि धरणातील विसर्गाने सांगलीकरांची चिंता वाढवली आहे.

साडे पाच टीएमसी पाण्याची आवक

पश्चिम घाटासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणात प्रति सेकंद 64 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी धरणाचे दरवाजे 9 फुटांनी उघडून 65,600 क्युसेक्स आणि पायथा वीजगृहातील दोन्ही युनिटमधून 2100 असा एकूण 67,700 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

चोवीस तासांत उच्चांकी पावसाची नोंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत 659 मिलीमीटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे सर्वाधिक 316 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 192 तर महाबळेश्वरला 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणात प्रति सेकंद 60 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून गेल्या चोवीस तासांत पाणीसाठ्यात तब्बल साडे पाच टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

पूल, बंधारे पाण्याखाली

धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं कोयना नदीवरील मूळगाव पूल आणि वेण्णा नदीवरील किडगाव, म्हसवे पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच कोल्हापूर पद्धतीच बंधाऱ्यांनाही जलसमाधी मिळाली आहे. कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कराडच्या कृष्णा नदीचे वाळवंट पुराच्या पाण्याखाली जाऊ लागले आहे. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं सांगलीकरांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *