अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी तरुणीने तक्रार दिली होती. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत कळमकर यांनी तिला संपर्कात ठेवले, त्यानंतर नगर शहरातील विविध ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
मोबाईलवर व्हिडिओ कॉल करुन वेळोवेळी कपडे काढण्यास भाग पाडून तासनतास त्रास देत असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केल्याचाही गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. या संदर्भातील काही व्हिडिओ पुरावेही पीडितेने पोलिसांकडे जमा केल्याची माहिती समोर आली आहे.
महापौर कळमकर फरार
गुन्हा दाखल होताच माजी महापौर अभिषेक कळमकर फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नगर शहरात संतापाची लाट उसळली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
