आई, तू दुसरा नवरा केलास, मी पुन्हा लग्न केलं तर काय? सख्ख्या माऊलीने जीव घेतला, महाराष्ट्र हादरवणाऱ्या खून प्रकरणाचा छडा

ज्या आईच्या कुशीत बाळ स्वतःला सुरक्षित समजतं, त्याच माऊलीने रागाच्या भरात पोटच्या लेकीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्रेमप्रकरणातून घरी सुरु असलेल्या वादाने इतके भीषण वळण घेतले की, एका तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. मात्र एका सतर्क रिक्षा चालकामुळे हा भयानक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदिनी राजू धिवरे, असे २१ वर्षीय मयत तरुणीचे नाव आहे, तर भारती उमेश साबळे असे मुख्य आरोपी असलेल्या आईचे नाव आहे. सह-आरोपी सावत्र पिता उमेश गोविंद साबळे आणि मामा अमोल गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनीचा विवाह झाला होता, मात्र पतीपासून विभक्त होऊन ती गेल्या तीन वर्षांपासून आईसोबत राहत होती. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे होते, परंतु आईचा या लग्नाला तीव्र विरोध होता.

१९ फेब्रुवारीला दुपारी घरात कोणी नसताना पुन्हा वाद उफाळून आला. वादादरम्यान नंदिनीने आईला विचारले, तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम केले तर काय हरकत आहे? या बोचऱ्या प्रश्नाने भारतीचा राग अनावर झाला आणि तिने समोर पडलेल्या रबरी पाईपने नंदिनीचा गळा आवळून तिची हत्या केली.

गादीत गुंडाळला मृतदेह, विल्हेवाटीचा असा होता कट

हत्येनंतर भारतीने पती उमेश आणि भाऊ अमोल यांना बोलावून घेतले. त्यांनी मिळून मृतदेह गादीत गुंडाळला. कोणाला संशय येऊ नये म्हणून घर बदलत आहोत असा बहाणा करत त्यांनी रिक्षात संसारोपयोगी भांडी पाण्याचे ड्रम आणि त्यासोबतच मृतदेह भरला. कन्नडच्या शेतात नेऊन मृतदेह गुपचूप गाडण्याचा त्यांचा कट होता.

रिक्षाचालकाचा संशय आणि पोलिसांचा धाडसी छडा

तिसगाव चौफुली परिसरात रिक्षा पोहोचल्यावर रिक्षाचालकाला त्यांच्या वागण्याबद्दल आणि गाडीतील वस्तूंचा संशय आला. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रिक्षा उघडली असता आत गादीमध्ये गुंडाळलेला तरुणीचा मृतदेह पाहून अधिकारीही हादरले. सुरुवातीला आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आईने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *