मुंबईत पावसाचं थैमान, पाण्यात अडकला तर काय कराल? BMC मदतीला धावणार, डायल करा हा नंबर

मुसळधार पावसाने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला झोडपले. मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे मुंबईतील जवळपास निम्मी मुंबई जलमय झाली होती. घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले. तसंच रस्त्यावर वाहने अडकून वाहतूककोंडी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पाणी शिरल्याने ‘बेस्ट’ बस गाड्याही बंद पडल्या. त्यामुळे महत्वाच्या कामानिमित्त सकाळीच घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. जागोजागी पाणी साचल्याने नालेसफाईची कामे नीट न होण्याबरोबरच महापालिकेच्या विविध उपाययोजना अपयशी ठरल्याने त्यांच्या कारभारावर सर्वच स्तरांतून टीकाही झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांच्या मदतीसाठी एक नंबर जारी करत मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी रेल्वे आणि BEST बस सेवा सुरळीत सुरू आहेत. BMC यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले आहे.

“आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सर्व उपाययोजना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात 1916 या मदतसेवा क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा,” असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

रम्यान, “सद्यस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह ‘बेस्ट’ वाहतूक सुरळीतपणे सुरt आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष फिल्डवर अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे,” असा दावाही महापालिकेकडून करण्यात आला आहे.

मुंबईकरांचे प्रचंड हाल, कुठे-काय घडलं?

मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजल्यापासून मोठ्या भरतीला सुरुवात झाली. ती दुपारी सव्वातीनपर्यंत होती. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू होताच हळूहळू मुंबईतील अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली. पावसाचे रौद्ररुप पाहता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच मुंबई महापालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महापालिकेकडून सकाळी साडेनऊच्या सुमारास सुट्टी जाहीर करण्यात आली. तोपर्यंत काही मुंबईकर कामानिमित्त घराबाहेर पडले. पावसाचे रौद्ररुप पाहून काहींनी घरातच राहणे पसंत केले.

जोरदार पावसाचा फटका पुन्हा दादरमधील हिंदमाता, हिंदू आणि पारशी कॉलनी, दादर टीटी या भागांना बसला. या भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परळ हिंदमातामार्गे पुढे दक्षिण मुंबईकडे जाणारा मार्गच बंद झाला. अंधेरी वीरा देसाई रोडवर पुन्हा सोमवारसारखीच परिस्थिती होती. हा भागही जलमय झाला. गांधी मार्केट शीव सर्कल, जेव्हीएलआर, कांजुरमार्ग, कुर्ला एलबीएस मार्ग, क्रांती नगर, बैल बाजार,वडाळा परिसर किडवई मार्ग, वडाळा चार रस्ता,वडाळा एमबीपीटी कॉलनी, भांडुप पश्चिम, अंधेरी सब वे, मालाड सब वे, कांदिवली पोयसर सब वे, वांद्रे कुर्ला संकुल, दहिसर आनंद नगर परिसर, बोरिवली पश्चिम साई बाबा नगर, अंधेरी पश्चिम एस. व्ही रोड, आरे युनिट नंबर २२, सांताक्रूझ पश्चिम वाकोला, पवई, विक्रोळी पूर्व ब्रिज,मानखुर्द स्थानक परिसर, चुनाभट्टी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या भागात कमरेएवढ्या पाण्यातून अनेक जण वाट काढत होते. येथील रस्त्यालगत पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांत पाणी शिरले. तर दुचाकी वाहने तरंगू लागली होती. या भागातील काहींच्या घरात, दुकानात आणि इमारतीच्या तळमजल्यामधील घरातही पाणी शिरल्याने अनेकांच्या वस्तूंचे नुकसान झाले. ते वाचवण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू होता. मुंबईतील काही बैठ्या चाळीत कमरेच्याही वर पाणी असल्याने पुरस्थितीच निर्माण झाली होती. एलबीएस मार्ग, जेव्हीएलआर मार्गांवर काही पट्ट्यात पाणी तुंबल्याने हे मार्ग सकाळपासून पूर्णपणे ठप्प झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *