आयटी कंपनीत काम करणाऱ्या 28 वर्षीय अभिनेत्री तरुणीला गाण्यांच्या अल्बममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कराड येथे नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विशाल दीपक (रा. कराड, जि. सातारा) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिसांनी हा गुन्हा ‘झिरो एफआयआर’ने कराड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पीडित तरुणी मूळची परराज्यातील असून, सध्या पुण्यात आयटी कंपनीत कार्यरत आहे. तिला अभिनयाची आवड असल्याने तिने ‘ओम तेजा प्रॉडक्शन’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन केला होता. या ग्रुपमध्ये विशालने शॉर्ट फिल्मसाठी मुलगी हवी असल्याची पोस्ट टाकली होती. त्यानंतर त्याने तरुणीशी संपर्क साधून ‘अल्बम साँगसाठी शूटिंग आहे’ असे सांगून कराडला बोलावले.
तरुणी ठरल्याप्रमाणे जूनमध्ये कराडला गेली. विशालने बस स्थानकातून तिला स्वतःच्या घरी नेले. दोन दिवस सलग विविध घाटांवर अल्बमचे शूटिंग झाले. मात्र, तिसऱ्या दिवशी विशालने तिला एका रिकाम्या फ्लॅटवर नेले आणि बलात्कार केला, असे तक्रारीत नोंद आहे.
घटनेनंतर तरुणीला पुण्यात पाठवले. त्यानंतर विशाल फोनवर संपर्क साधत राहिला. ‘लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू या’ असा आग्रह त्याने धरला. तरुणीने नकार दिल्यावर त्याने पाठलागही केला. हा प्रकार सात जून 2025 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान पुणे व कराड येथे घडल्याने चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आसारामच्या जामिनात वाढ
दुसरीकडे, बलात्कार प्रकरणी दोषी ठरलेला आणि गांधीनगर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयाने 3 सप्टेंबरपर्यंत तात्पुरता जामीन दिला. आसारामचा तात्पुरता जामीन 21 ऑगस्ट रोजी संपणार होता. न्यायमूर्ती इलेश व्होरा आणि पीएम रावल यांच्या खंडपीठाने तो 3 सप्टेंबरपर्यंत वाढवला. या प्रकरणाची पुढील सुनावणी त्या दिवशी घेण्यात येईल.
राजस्थान उच्च न्यायालयात 29 ऑगस्ट रोजी दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणी त्याच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.