एका फार्मा कंपनीत लाखो रुपये पगार देण्याचे आमिष दाखवून नांदेडच्या तरुणाला विदेशात नेले. पण तिथे गेल्यानंतर त्या तरुणाला क्रिप्टो करंसी स्कॅमचे काम करण्यास भाग पाडले. विरोध केल्याने तरुणाला डांबवून ठेवून मारहाण केली, हाताची करंगळी देखील तोडली आणि घरच्यांना मारहाणीचे व्हिडिओ पाठवून १० लाखाची खंडणी मागितली. नांदेडच्या समीर महेबूब शेख असे पीडित तरूणाचे नाव आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्याला सुखरूप परत आणण्यात यश आलं आहे.
समीर महेबूब शेख हा शहरातील सिडको भागातील रहिवासी आहे. बारावी पर्यंत शिक्षण झालं. एका दलालाने त्याला कंबोडीया देशात फार्मा कंपनीत नोकरी लावतो आणि एक लाख रुपये पगार मिळणार, असे आमिष दाखवले. त्या दलालाने एक लाख रुपये घेऊन सहा महिन्यापूर्वी समीरला कंबोडिया देशात नेले. दोन महिने त्याला कुठलेच काम न लावता महिना ४० हजार रुपये दिले. त्यानंतर क्रिप्टो करंसी स्कॅम करण्यास भाग पाडले. काम जमत नसल्याने त्याने नकार दिला, त्यानंतर आरोपींनी त्याचे दोरीने हात पाय बांधून एका खोलीत डांबवून ठेवले. सतत मारहाण देखील करायचे, असे समीरने सांगितले.
मारहाणीचे व्हिडिओ घरच्यांना मोबाईलवर पाठवून आरोपींनी १० लाख रुपयाची खंडणी मागितली. खंडणी न दिल्याने आरोपीनी त्याच्या डाव्या हाताची करंगळी तोडली. आपल्या मुलाचा जीव वाचावा आणि सुखरूप घरी यावा यासाठी कुटूंबियांनी लाखो रुपये पाठवले. म्यानमार्क येथे खंडणीचा प्लॅन आखण्यात आला होता. दरम्यान पैसे पाठवून ही मुलाची सुटका होतं नसल्याने अखेर समीरचे नातेवाईकांनी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांची भेट घेतली.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कंबोडिया देशातील भारतीय दुतावास कार्यालयास संपर्क केला. त्यानंतर नातेवाईकांनी दिल्ली येथील मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स कार्यालयात तक्रार दाखल केली. अखेर कंबोडिया देशातील पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका केली आणि १४ ऑगस्ट रोजी समीर महेबूब शेख हा तरूण मायदेशी परतला. आपला मुलगा सुखरूप घरी आल्याने आई वडिलांसह नातेवाईकांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, नातेवाईकाडून पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्यासह लोकप्रतिनिधीची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.