करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना पुन्हा लॉकडाउन होतोय की काय, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. हा धोका टाळण्यासाठी महापालिकेच्या मार्शलने विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर वचक ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई वाढवली असून, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील नियमभंग करणाऱ्यांकडून २३.७४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तिसऱ्या टप्प्याचे करोना लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र अलीकडेच करोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत आहेत. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा वेग पुन्हा वाढवण्यात येत आहे. यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर बेफिकीर फिरणाऱ्या व इतरांसाठीही धोका ठरणाऱ्यांविरुद्ध पालिकेच्या पथकांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र, प्रत्यक्ष रेल्वे गाड्यांतील व रेल्वे स्थानकांतीलही गर्दी वाढत असल्याने व तेथेही विनामास्क वावरणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने तेथेही दंडवसुलीसाठी मार्शल नेमून कारवाई सुरू झाली.
पश्चिम रेल्वेवर १ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत ६३१८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली व १० लाख १२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत मध्य रेल्वे मुंबई विभागात ६१७७ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यांच्याकडून १३ लाख ६६ हजार ३६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रोज सरासरी २०० जणांना दंड
पश्चिम रेल्वेवर ४ मार्च रोजी ३०१, ५ मार्चला २५९, ६ मार्चला २७०, ७ मार्चला १९१, ८ मार्चला ३०० आणि ९ मार्चला २९७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात एकूण ४०१७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. मार्च महिन्यात रोज सरासरी २००हून अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरही रोज सरासरी २०० प्रवाशांवर कारवाई होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.