पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे आकस्मिक निधन

पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे आकस्मिक निधन

पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार कृष्णा अर्जुन घोडा (६१) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवारी पहाटे झोपेतच अकस्मात निधन झाले.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कृष्णा घोडा हे पालघर मतदारसंघातून कॉंग्रेसचे राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांचा पराभव करून शिवसेनेतर्फे निवडून आले होते. याशिवाय चार दिवसांपूर्वी झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीला धक्का देत ते विजयी झाले होते.
शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी डहाणूमधून ते तीन वेळा विधानसभेवर राष्ट्रवादीतर्फे निवडून आले होते. डहाणू, पालघरमधील आदिवासी शेतकरी बांधवांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने डहाणू, पालघर तालुक्यांची मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या पश्‍चात आई प्रतिभा, पुत्र राजेश, पत्नी अनुसया असा परिवार आहे. आज दुपारी १.३० च्या सुमारास कृष्णा घोडा यांच्यावर रानशेत येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप देण्यासाठी डहाणू, पालघर तालुक्यामधील हजारोंचा जनसमुदाय रणरणत्या उन्हात स्मशानभूमीत उपस्थित होता. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, उदयबंधू पाटील यांनी कृष्णा घोडा यांना याप्रसंगी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांच्यासह विविध पक्षांचे मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णा घोडा हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. हा आजार इतका गंभीर झाला की त्यात त्यांची एक किडनी निकामी झाली. तेव्हा आपल्या या कर्तृत्वशाली भावाच्या पाठीशी त्यांची बहीण रमी वरठा या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या भावास आपली किडनी दान केली. यामुळे कृष्णा घोडा यांना पुनर्जन्मच लाभला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *