सोलापुरात अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या

पुरोगामीपणाची ओळख असलेल्या महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी भक्कम कायदा असूनही प्रत्यक्षात खेडय़ांबरोबर शहरातही बालविवाह थांबत नसल्याचे दिसून येते. सोलापुरात तर गेल्या महिन्यात बालवयात झालेल्या एका १४ वर्षांच्या अल्पवयीन विवाहितेने सासरी आत्महत्या केली. या घटनेमुळे आत्महत्येबरोबरच समाजातील वाढत्या बालविवाहांचा प्रश्न चर्चेत आला आहे.

घरात कोणीही नसताना अल्पवयीन विवाहितेने  दुपारी अडीचच्या सुमारास घरातील छताच्या लोखंडी अ‍ॅंगलला ओढणीच्या साह्य़ाने गळफास घेतला. तिचा विवाह गेल्याच महिन्यात म्हणजे २० जानेवारी रोजी झाला होता. अवघ्या चौदा वर्षांच्या वयातच तिचा विवाह करण्यात आला होता. विवाहापूर्वी  ती सोलापूर तालुक्यातील एका आश्रमशाळेत शालेय शिक्षण घेत होती. शालेय शिक्षण मध्येच सोडवून तिचा विवाह उरकण्यात आला होता. विवाह झाल्यानंतर ती सासरी नांदण्यासाठी आली होती.

दरम्यान, विवाहानंतर तिच्या भावाने भ्रमणध्वनीद्वारे मेव्हण्याशी संपर्क साधून बहिणीला काही दिवसांसाठी माहेरी पाठविण्यास सांगितले होते. परंतु त्यानंतर काही तासातच तीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे निश्चित कारण लगेचच स्पष्ट झाले नसले तरी तिचा बालवयातच विवाह झाला होता, ही बाब उघडकीस आली. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. कायद्याने बंदी असूनही राज्यात बालविवाह वाढत चालले आहेत. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही खेडय़ात तसेच लहान-मोठय़ा शहरातदेखील बालविवाह होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *