एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या गप्पा आपण मारतो, राज्यकर्ते 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या आणि गडचिरोली, चंद्रपूरसारख्या आदिवासी भागांचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सांगतात. मात्र, आजही चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात खराब रस्त्यामुळे नागरिकांना वेळेत सुविधा न मिळाल्याने जीव गमावण्यापर्यंतची मन हेलावणारी घटना घडत आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्यामुळे प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आहे. संगीता गेडाम असं या महिलेचे नाव आहे, या घटनेमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य सुविधेच प्रश्न उपस्थित झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील दुर्गम असलेल्या घोडनकप्पी गावात खराब रस्त्यामुळे प्रसुतीनंतर एका आईला आपला जीव गमवावा लागल्याची ही घटना घडली आहे. घोडनकप्पी हे गाव तेलंगाणा सीमेवर असून अतिशय दुर्गम असलेल्या या गावात पक्का रस्ता नाही. अशातच या महिलेची आठव्या महिन्यात घरीच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात आली. मात्र, खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका गावात येऊ शकली नाही आणि यातच या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्थानिक प्रशासन आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, संबंधित घटनेबाबत जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करण्यात येत होती. सोबतच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घोडनकप्पी गावात रस्ता नसल्यामुळे संबंधित महिलेला आधीच माहेरी जाण्याची किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या महिलेची पूर्ण व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, महिलेनेच माहेरी जाण्यास किंवा आरोग्य केंद्रात राहण्यास नकार दिला होता. आठव्या महिन्यातच त्या महिलेची प्रसूती झाली असून ही दुर्दैवी घटना घडली आहे. सोबतच जिल्हा आरोग्य प्रशासनाने अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करण्याचे देखील आवाहन नागरिकांना केलं आहे.
