राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी भेसळखोर आणि बनावट उत्पादन विकणाऱ्यांविरोधात राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. जवळपास दररोज राज्याच्या विविध भागात एफडीएच्या पथकांकडून धाडी (FDA Raid) टाकल्या जात आहेत. अलीकडेच शनिवारी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात एफडीएकडून सौंर्दयप्रसाधनाची विक्री करणाऱ्या एका दुकानावर धाड टाकली होती. यावेळी मोठ्याप्रमाणावर भ्रामक दावा करणाऱ्या सौंर्दयवर्धक उत्पादनांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये ‘ब्रेस्ट एन्लार्ज’ (Breast Enlarge स्तनांचा आकार वाढवण्याचा दावा करणारे प्रोडक्ट), ‘बट एन्हान्समेंट’ (पार्श्वभागाचा आकार सुडौल करण्याचा दावा करणारे प्रोडक्ट) आणि ‘फॅट बर्नर’सारखे (चरबी कमी करण्याचा दावा करणारे प्रोडक्ट) भ्रामक दावे करणाऱ्या उत्पादनांचा समावेश होता. या सर्व उत्पादनांवर बॅच नंबर, उत्पादन परवाना क्रमांक आणि उत्पादक कंपनी, हे सर्व तपशील नमूद करण्यात आले नव्हते. तसेच उपचार आणि सौंर्दयाशी संबंधित दावा करणाऱ्या तेलाचा साठाही यावेळी एफडीएन जप्त केला. याची किंमत जवळपास 1.02 लाखांच्या घरात आहे.
याशिवाय, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरातही अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून छापा टाकण्यात आला. याठिकाणी वैध परवाना नसताना सौंर्दयप्रसाधनांची आणि औषधांची निर्मिती केली जात असल्याचे दिसून आले. एफडीएकडून या कारखान्यातील औषधे, सौंर्दयप्रसाधने, कच्चा माल आणि यंत्रांसह तब्बल 3.97 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून साताऱ्याच्या कराड येथेही मोठी कारवाई करण्यात आली होती. याठिकाणी एफडीएने तब्बल 29.45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याठिकाणी असलेल्या उत्पादनांवर बॅच नंबर, लेबलिंग, उत्पादनाची तारीख नमूद करण्यात आली नव्हती.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाकडून लातुरात सात ते आठ खव्याच्या दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान पथकाच्या हाती भेसळयुक्त माल लागला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा आणि तंबाखू विक्रेत्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरू केलीय.. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने लातूर शहरात सात ते आठ खवा विक्रीच्या दुकानांची तपासणी केली. दुकानांमधील खाद्यपदार्थांची पाहणी करण्यासह आवश्यक कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान कोणताही भेसळयुक्त अथवा संशयास्पद माल आढळून न आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
