पुण्याहून शिर्डीला जाणं सोपं होणार! पहिल्यांदाच सुरू होणार थेट रेल्वेसेवा; ‘इंटरसिटी’प्रमाणे ट्रेन

पुण्यातून सुटणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये उद्या, बुधवारी (१७ जून) उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये पुणे ते शिर्डीदरम्यान ‘इंटरसिटी’प्रमाणे रेल्वेसेवा सुरू होणार आहे. याशिवाय हडपसर ते दानापूरदरम्यान नवीन ‘अमृत भारत सेवा’ होणार आहे. पुणे-शिर्डी रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेळापत्रक कधी जाहीर होणार?

पुणे-शिर्डीदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे; पण थेट रेल्वेसेवा नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे पुणे-शिर्डी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. त्यानुसार आता रेल्वे प्रशासनाने ही रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वेमंत्री वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. अद्याप या रेल्वेगाडीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. येत्या दोन दिवसांत या गाडीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *