नांदेडमधील आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आंचलने प्रियकर सक्षम ताटे याच्या धाकट्या भावावर चुकीच्या हेतूने स्पर्श करत असल्याचे धक्कादायक आरोप केले होते. मात्र उलट आंचलच त्याला ‘बाळा, तू माझ्याशी बोलत का नाहीस?’ असं विचारत असल्याचा दावा सक्षमच्या आईने केला आहे.
आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे याची गेल्या वर्षी आंचल मामीडवार हिचे वडील, भाऊ यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर प्रियकर सक्षम ताटे याच्या शवासोबत आंचलने केलेले विवाहविधी देशभरात गाजले होते.
आंचल घर सोडून गेल्याने चर्चा
आंचलचे प्रेमसंबंधी तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. आंचलने स्वतःच्याच कुटुंबाविरोधात साक्ष दिली होती. त्यानुसार नांदेडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आंचलने सक्षमच्या घरी कायमचे राहणार असल्याचे म्हटले होते. पण काही दिवसांपूर्वी सक्षमच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर येत आंचल घर सोडून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणाची पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली.
सक्षम ताटेच्या भावावर गंभीर आरोप
आंचल अचानक घर सोडून का गेली? प्रेमाच्या आणाभाका विसरली का? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या. त्यानंतर आंचल मामीडवार हिने माध्यमांसमोर येत घर सोडण्याविषयी धक्कादायक आरोप केला. सक्षमचा लहान भाऊ शिवम आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप आंचल मामीडवारने केला. त्यामुळेच आपण घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही तिने केला. तर सक्षमला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकटेच लढत असल्याचंही तिने म्हटलं.
आंचलवर सक्षमच्या कुटुंबाचा पलटवार
आजीकडे जाण्याचा बहाणा करुन आंचलने घर सोडल्याचा दावा सक्षमची आई संगीता ताटे यांनी केला आहे. आचलच्या आरोपाचे खंडन करत सक्षमची आई व आत्या यांनी पलटवार केला. आंचल ही सक्षमचा भाऊ शिवम याला ‘बाळा तू मला का बोलत नाही! तू इतका उदास का आहेस. तू माझ्या मेसेजला का उत्तर देत नाहीस. तू बोलत नसल्यामुळे माझे मन लागत नाही’ सारखे मेसेज करत असल्याचा दावा सक्षम-शिवमच्या आईने स्क्रीनशॉट दाखवून केला. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
