तरुणीच्या कुटुंबियांच्या मनाविरोधात लग्न केल्याप्रकरणी 17 जणांनी 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या केली. ही घटना ठाण्यातील असून हे ऑनर किलिंगचं प्रकरण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भिवंडी तहसीलमधील जाहू नंदूर्की गावात ही घटना घडली आहे. सत्यम कारबारी या तरुणावर 17 जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती भिवंडी तालुका पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विजय शिरसाट यांनी दिली.
मृत सत्यम कारबारीचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र तेव्हापासून त्याच्या पत्नीच्या कुटुंबाचा सत्यमवर राग होता. सत्यमची पत्नी ही हत्येतील प्रमुख आरोपीची चुलत बहिण असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपींवर भारतीय दंडविधान कलम 302 अंतर्गत खुनाचा आणि आर्म्स अक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हत्येनंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

