मोठ्या संख्येने बँकांचे अधिकारी व कर्मचारी होणार निवृत्त

मोठ्या संख्येने बँकांचे अधिकारी व कर्मचारी होणार निवृत्त

सरकारी बँकांचा कारभार सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असताना सध्या हाताशी असणाऱ्या गुणवत्तेवर सरकारला फार काळ विसंबून राहता येणार नाही, अशी स्थिती आहे. पुढील दोन वर्षांत भारतीय स्टेट बँकेसह २२ सरकारी बँकांतून तब्बल ८० हजार पदे रिक्त होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने बँकांचे अधिकारी व कर्मचारी निवृत्त होणार असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होणार आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात तसेच पुढील आर्थिक वर्षात ७८ हजार ८०० बँक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. चालू आर्छिक वर्षात ३९ हजार ७५६ बँक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. यामध्ये १९ हजार ६५ अधिकारी तर १४ हजार ६६९ लिपिक यांचा समावेश आहे. याखेरीज ६ हजार २२ अन्य कर्मचाऱ्यांना पेन्शन आदी लाभ सुरू होतील.

सुमारे ३९ हजार बँक कर्मचारी पुढील आर्थिक वर्षात निवृत्त होणार आहेत. यामध्ये १८ हजार ५०६ अधिकारी तर १४ हजार ४५८ लिपिक यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त होणार असल्यामुळे ही पदे भरताना नियमांत शिथिलता आणण्याबातही विचारविनिमय सुरू आहे. मध्यम स्तरावरील पदे भरण्यासाठी सरकार कदाचित कंत्राटी पद्धतीनेही उमेदवार घेण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *