मध्य रेल्वेवर आज ‘प्रवासकोंडी’

ठाकुर्ली स्थानकातील पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानच्या सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस सुमारे चार तास बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सकाळी ९.४५नंतर दुपारी १.४५पर्यंत या भागातून एकही गाडी धावणार नसल्याने या महाब्लॉकमुळे लाखो रेल्वे प्रवाशांची प्रवासकोंडी होणार आहे. या भागात वाहतुकीची पर्यायी व्यवस्था नसल्याने या भागातील प्रवाशांची रिक्षा चालकांकडून लूटमार होण्याची शक्यता आहे. तर ऐन नाताळच्या दिवशी घेतलेल्या या ब्लॉकमुळे सुट्टीच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मुंबई सीएसएमटी ते कल्याण दरम्यान ठाकुर्ली स्थानकात बुधवारी पादचारी पुलांचे गर्डर चढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी ४०० मे. टन वजनाचे चार गर्डर चढवले जाणार आहेत. परंतु या संदर्भातील नियोजन ऐनवेळी करून सणाच्या दिवशी रेल्वे प्रशासनाने हा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. या काळात प्रवाशांना कल्याण किंवा डोंबिवली रेल्वे स्थानकात अडकून पडावे लागणार आहे.

रेल्वेकडून कल्याणकडून कसारा आणि कर्जत दिशेकडे तर डोंबिवली स्थानकातून मुंबई सीएसएमटीच्या दिशेकडील मार्गावर पंधरा ते वीस मिनिटांनी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु कल्याण आणि डोंबिवली दरम्यानच्या प्रवाशांना या मार्गावर रस्ते वाहतुकीशिवाय पर्याय नाही. या मार्गावर केडीएमटी आणि एसटी महामंडळाकडूनही कोणत्याही सेवेची घोषणा करण्यात आली नसल्याने रिक्षा वाहतुकीशिवाय प्रवाशांना पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे या भागात प्रवाशांची मनमानी लूट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *