शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्यास पोलीस कोठडी

तालुक्यातील वेळापूर येथील चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना १४ डिसेंबरला घडल्यानंतर आरोपी अमोल  निमसे फरार झाला होता  त्याला पकडण्यात आले असून, तो सिन्नर तालुक्यात वडांगळी येथे सापडला. आरोपीस येथील सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी सुरेगाव (कोळपेवाडी ) येथे एका शाळेत चौथीत शिक्षण घेत आहे. ती शुक्रवार, दि. १३  डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना आरोपीने पीडित मुलीला खोटी ओळख सांगून  तिच्यावर शहजापूर कोळगाव रोड शेजारी असलेल्या कालव्या लगतच्या निर्मनुष्य वस्तीत असलेल्या बंद खोलीत लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी पीडित मुलीने प्रतिकार केल्यानंतर  तिला आरोपीने जबर मारहाण करून गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा दम देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. दरम्यान मुलगी शाळा सुटल्यावर घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या घटनेच्या मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीनेच सदर मुलीस मोटार सायकलवर बसवून नेल्याचे  दिसून आले. पीडित मुलीच्या अपहरणानंतर जिल्ह्य़ातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या चार पथकांच्या तुकडय़ा कोपरगावच्या दिशेने अहमदनगर येथून रवाना करण्यात आल्या तरीही सदर आरोपी हा पोलिसांना हुलकावणीच देत होता. आरोपीचे शोधासाठी शहाजापूर, सुरेगांव, पांगरी वडांगळी परिसरातील सगळा भाग पालथा घातला. अखेर सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे सदर आरोपी अमोल निमसे याचा ठावठिकाणा मंगळवारी दुपारी ४ वाजता लागल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर, सहायक निरीक्षक  संदीप पाटील, मिथुन घुगे, दीपक बोरसे, सचिन इंगळे, भरत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ दत्तात्रय शिंगाडे, रवींद्र घुंगासे,मच्छिंद्र बर्डे,योगेश सातपुते,सुरेश पवार,असिर सय्यद,गणेश काकडे, जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुढील तपास सुरू

आरोपीने केलेले गंभीर कृत्य,गुन्ह्य़ातील क्रौर्यता व तपासात मिळालेले पुरावे बघता जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी सरकारी वकिलांचे म्हणणे लक्षात घेऊन आरोपी अमोल निमसे यास आठ दिवसांची म्हणजे २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्य़ात आरोपीस मदत करणरे आणखी कोणी आहेत काय याचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *