त्र्यंबकेश्वरमध्ये औरंगाबादचे तीन विद्यार्थी बुडाले

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पर्यटनासाठी गेलेले औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी दुगारवाडी धबधब्याच्या डोहात बुडाले. त्यातील एका विद्यार्थीनीचा मृतदेह सापडला असून, दोन विद्यार्थी बेपत्ता आहेत.

औरंगाबादच्या कृषी महाविद्यालयात तेलंगण राज्यातील काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सहा विद्यार्थी पर्यटनासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. यामध्ये गिरिधर आकाश (२०), व्यंकटेश रेड्डी (२०), एल. काव्या (२०), अनुषा (२१), रघुवंशी, कोटी रेड्डी यांचा समावेश आहे.

मंगळवारी सायंकाळी हे विद्यार्थी दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी गेले होते. हा परिसर निर्जन असून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी दरीतून जावे लागते. उशीर झाल्याने आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने तीन विद्यार्थी माघारी फिरले.

परंतु, तीन विद्यार्थी रात्रभर प्रतीक्षा करूनही माघारी परतले नाही. त्यामुळे बुधवारी इतर विद्यार्थ्यांनी त्यांना शोधण्यासाठी पुन्हा दुगारवाडी धबधबा गाठला. स्थानिकांना माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. वैनतेय गिर्यारोहण संस्थेशीही पोलिसांनी मदतीसाठी संपर्क साधला. शोध सुरू असताना पाण्यात अनुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

सेल्फी काढताना पडून तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंह यांनी व्यक्त केला. अन्य दोन विद्यार्थ्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *