श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करीत यजमानांचा निम्मा संघ तंबूत धाडला आहे. फिरकीपटू आर.अश्विनच्या फिरकी जादूवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. गॅले कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया श्रीलंकेचे पहिले पाच फलंदाज स्वस्तात माघारी परतले असून संघाच्या धावसंख्येने अद्याप शंभरचा आकडा देखील गाठलेला नाही. इशांत शर्माने श्रीलंकेची सलामीजोडी फोडून संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अश्विनने संगकारा, लहिरु थिरीमाने आणि जेहान मुबारक या महत्त्वाच्या खेळाडूंना माघारी धाडले, तर वरुण अरोनने कुशल सिल्व्हाला बाद केले आहे.
सध्या कर्णधार अँजलो मॅथ्यूज (२६) दिनेश चंडीमलच्या (५) साथीने किल्ला लढवत आहे.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना करूणारत्ने व सिल्हाने सावध सुरूवात केली खरी मात्र ६ व्या षटकांत इशांत शर्माच्या गोलंदाजीवर करूणारत्ने ९ धावांवर तर ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वरूण अरोनच्या गोलंदाजीवर सिल्वाचा( ५) बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेचा भरवशाचा फलंदाज संघकारा मैदानात आल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला, मात्र ५ धावांवर खेळत असताना अश्विनने त्याला, थिरिमनेलाही (१३) आणि लागोपाठ मुबारकला (०) माघारी धाडले.
भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याची २२ वर्षांची प्रतीक्षा संपविण्यास उत्सुक असून भारताने ३ फिरकी गोलंदाजांसह ५ जलद गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे

