चीनमधील तिआनजीन पोर्ट सिटी एकापाठोपाठ झालेल्या शक्तिशाली स्फोटांनी हादरली आहे. स्फोटांमध्ये किमान 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून सुमारे 400 जण जखमी झाले आहेत.
चीनच्या उत्तरेकडील भागातल्या तिआनजीन पोर्ट शहरात बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हे स्फोट झाले. धोकादायक असे रासायनिक पदार्थ ठेवलेल्या गोदामात हे स्फोट झाल्याचं वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिलं आहे.
स्फोटांमध्ये 32 जण मृत्युमुखी पडले असून त्यात अग्निशमन दलाच्या 4 जवानांचाही समावेश आहे. तर 400 जण जखमींपैकी 32 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
स्फोटांची तीव्रता इतकी जोरदार होती की त्याचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत देखील जाणवले. त्यामुळे परिसरातील इमारती, गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक इमारती खिळखिळ्या झाल्या असून घरं आणि गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.
स्फोटामुळे लागलेल्या आगीचे लोळ उशिरापर्यंत परिसरात पसरले होते. मात्र अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. हा औद्योगिक अपघात असल्याचं म्हटलं जातं.

