रेल्वेगाड्यांमध्ये चहा-नाश्ता, जेवण महागणार

येत्या काही दिवसांत रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, जादा पैसे मोजण्यासाठी तयार राहा! लवकरच चहा-नाश्ता आणि जेवण महागणार आहे. रेल्वे प्रशासनातील संबंधित विभागाकडून जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवण महागणार आहे. या एक्स्प्रेसची तिकीटे घेतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसेही द्यावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही महागाईचे चटके बसणार आहेत.

चार महिन्यांनंतर नवे दर लागू होणार

नवीन मन्यू आणि दर पुढील १५ दिवसांत अद्ययावत होतील. तर १२० दिवसांनी (चार महिने) हे नवे दर लागू होणार आहेत. त्यावेळी राजधानीच्या फर्स्ट एसी कोचमधील जेवण १४५ रुपयांऐवजी २४५ रुपये होणार आहे. सुधारित दरांमुळे फक्त प्रिमिअम ट्रेनमधील प्रवाशांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही चटके बसणार आहेत. नियमित मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये शाकाहारी जेवण ८० रुपयांना मिळेल. ते सध्या ५० रुपयांना मिळते. आयआरसीटीसीकडून रेल्वे प्रवाशांना अंडा बिर्याणी ९० रुपये, तर चिकन बिर्यानी ११० रुपयांना देण्यात येईल. नियमित ट्रेनमध्ये १३० रुपयांना चिकन करी मिळणार आहे.

२०१४ नंतर पहिल्यांदाच वाढ

सकाळच्या चहाच्या तुलनेत संध्याकाळचा चहा महागणार आहे. यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, संध्याकाळच्या चहासोबत रोस्टेड नट्स, स्नॅक्स आणि मिठाई आदी देण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाच्या एका अधिकाऱ्यानं या दरवाढीचं समर्थन केलंय. ‘आम्हाला रेल्वेतील कॅटरिंग सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करायची आहे. त्यामुळंच आम्ही हे पाऊल उचललं आहे. मागील वेळी २०१४ मध्ये दर बदलण्यात आले होते. आयआसीटीसीचा आग्रह आणि मंडळाकडून स्थापन केलेल्या मेन्यू अँड टॅरिफ कमिटीच्या शिफारशीनंतर दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *