सुरक्षेच्या कारणास्तव विमान प्रवासात कात्री, सुरे, काटे किंवा धार असलेल्या कोणत्याही वस्तू घेऊन जाण्यास बंदी आहे. अशा वस्तू आढळल्यास प्रवाशांना विमानात परवानगी दिली जात नाही किंवा त्या वस्तू जप्त केल्या जातात. मात्र, रविवारी औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या ‘राधे माँ’ हिला त्रिशूळ घेऊन विमानात बसण्याची परवानगी देण्यात आली. अन्य प्रवाशांनी याबद्दल तीव्र नाराजी नोंदवली. त्यावर विमानतळाची सुरक्षा पाहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्यांनी ‘राधे माँ’ची पाठराखणच केली. ‘राधे माँ’ला त्रिशूळ घेऊन विमानात जाण्याची परवानगी दिली गेली हे खरं आहे. मात्र, या त्रिशूळाला अजिबात धार नव्हती. त्यामुळं कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही,’ असं सीआयएसएफचे बीएल जट्ट यांनी स्पष्ट केलं.
जेट एअरवेजने मात्र या वादापासून हात झटकले आहेत. ‘विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफची आहे. आमचा या प्रकाराशी काहीही संबंध नाही,’ असं ‘जेट’नं म्हटलं आहे. तर, ‘जेट’च्या प्रवाशांनी सुरक्षा अधिकाऱ्यांवर पक्षपाताचा आरोप केला आहे. ‘सर्वसामान्य प्रवाशांना साधं नेलकटर घेऊन विमानात चढण्याची परवानगी दिली जात नाही. मग ‘राधे माँ’ला त्रिशूळासह प्रवास करण्याची परवानगी देऊन आमचा जीव धोक्यात का टाकण्यात आला, याची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
