अयोध्या खटला: ‘असा’ लागला निकाल

अयोध्येच्या वादग्रस्त खटल्यावर सुप्रीम कोर्टाने अखेर शनिवारी आपला अंतिम निकाल सुनावला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात अयोध्येची वादग्रस्त जागा ही ‘रामलल्लाची’च असल्याचा निकाल कोर्टाने दिला. संपूर्ण देशाचं या खटल्याकडे लक्ष लागून होतं. कोर्टानं निकाल काय म्हटलं आणि या निकालाआधी देशात सुरक्षेचा कसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता याचा हा आढावा…

रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागा ही रामलल्लाचीच असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे या जागेवर आता राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुप्रीम कोर्टाने यात मुस्लिम पक्षकारांनाही अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अयोध्येत मुस्लिम पक्षकारांना पर्यायी जागा मिळणार असून त्याचं नियोजन केंद्र आणि राज्य सरकार करणार आहे.

अयोध्या खटल्याचं गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण देशात ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्मीर येथील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. तर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली. पुण्यातही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे सुन्नी बोर्डाने स्वागत केले. अयोध्येत देण्यात येणार ५ एकर पर्यायी जागेच्या निर्णयाचंही स्वागत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, सुप्रीम कोर्टाने आज दिलेला निकाल ५-० असा सर्वसंमतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *