कारगिलमध्ये ‘मराठी तारकां’चा जवानांना सलाम

कारगिलमध्ये ‘मराठी तारकां’चा जवानांना सलाम

निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांची निर्मिती संकल्पना असलेल्या “मराठी तारका‘ या नृत्य-संगीत कार्यक्रमाचा विशेष शो कारगिलमधील भारतीय लष्करी जवानांसाठी नुकताच झाला. सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला “मराठी तारका‘च्या टीमने या ‘शो‘च्या माध्यमातून सलाम केला.

गेल्या सात वर्षांपासून “मराठी तारका‘ हा कार्यक्रम देश-विदेशात लोकप्रिय आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनातही हा कार्यक्रम सादर झाला होता. त्याचबरोबर शरद पवार, आशा भोसले, अभिनेत्री रेखा अशा विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी हा कार्यक्रम पाहून त्याचे कौतुक केले आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक भान जपत भारत-पाकिस्तान सीमेवर (बारामुल्ला), सुनामीग्रस्त गावांमध्येही “मराठी तारका‘चे शो याआधी सादर झाले आहेत.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले, श्‍वेता शिंदे, तेजा देवकर, प्राची पिसाट, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, राजेश बिडवे, सॅड्रिक डिसूझा, हितेश पाटील, बालनर्तक आदिती घोलप, विशाल जाधव या कलाकारांनी कारगिलमध्ये सादर केलेल्या नृत्यांना जवानांनी टाळ्या-शिट्ट्यांनी दाद दिली. कलाकारांबरोबर नाचण्याचा मोह जवानांनाही आवरता आला नाही. गायक विश्‍वजित बोरवणकर यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांमुळे वातावरण भारावून गेले होते. याप्रसंगी टिळेकर यांनी जवानांशी संवाद साधला. हितेश पाटील यांनी नृत्यदिग्दर्शन केले होते.

कुटुंबीयांपासून दूर, सीमेवर लढणाऱ्या आणि देशाचं रक्षण करणाऱ्या या जवानांना मराठी तारकांनी राख्या बांधल्या, तेव्हा ते भावुक झाले होते. जवानांसाठी खास बनवलेली मिठाई मराठी तारका टीमने देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. भारत-पाकिस्तान सीमेवर जवानांची खडतर जीवनशैली पाहताना टीमच्या सदस्यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला. प्रत्यक्ष ताबारेषेवर (LOC) तैनात असलेल्या मराठा बटालियनच्या जवानांसोबत “मराठी तारका‘च्या टीमने “वंदे मातरम‘, “भारतमाता की जय‘, “जय भवानी जय शिवाजी‘, अशा घोषणा देऊन वातावरण दुमदुमून सोडले.

भारत-पाकिस्तान सीमेवर नऊ हजार फूट उंचीवरील कारगिल येथे अत्यंत खडतर परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी “मराठी तारकां‘चा शो आयोजिला होता. कारगिलच्या या दुर्गम भागात कार्यक्रमासाठी संपूर्ण पथकाला घेऊन जाणे, हे मोठे आव्हानच होते. श्रीनगर ते कारगिल या मार्गावर ढगफुटीमुळे खचलेले रस्ते, ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडी, ऑक्‍सिजनचा अभाव अशा अनेक आव्हानांना तोंड देत, 14 तासांचा खडतर प्रवास करत आमच्या टीमने कारगिल गाठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *