धावत्या लोकलमध्ये तरूणीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी पकडलं आहे. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुरुवारी रात्री मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर छेडछाड आणि बलात्काराचा प्रयत्न झाला होता. ग्रँट रोड आणि चर्नी रोड या दोन स्टेशनदरम्यान रात्री 11 वाजता ही घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
ही तरुणी मालाड स्टेशनला चर्चगेट लोकलमध्ये चढली होती. पीडित तरुणी लेडीज डब्यात एकटीच असल्याचं हेरत आरोपीने डाव साधण्याचा प्रयत्न केला. डब्यात चढल्यानंतर त्याने चर्नी रोड स्टेशनदरम्यान तरुणीची छेडछाड करून बलात्काराचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे रात्रीची वेळ असूनही लेडीज डब्यात सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळे आरोपी डब्यात चढला आणि त्याने तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. यानंतर दुसरं स्टेशन येण्याआधीच आरोपी धावत्या ट्रेनमधून उतरला.
हा प्रकार समोर आल्यावर ट्रेनमधील इतर प्रवाशांनी पीडित मुलीला स्टेशन मास्तरकडे नेलं. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिची चौकशी केली.
मग रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला होता. आज त्यांना यश आलं.

