रत्नागिरी- गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्तांसाठी रत्नागिरी एसटी प्रशासनाने तब्बल १ हजार ४५० जादा गाडयांचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे गणेश उत्सव काळात जिल्ह्यातील विविध आगारांतून एकूण ७५ गाडया नियमित धावणार आहेत.
गणेशोत्सव हा कोकणात मोठया उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी असो किंवा अन्य गावांत कामधंद्यासाठी गेलेले कोकणातील माणसे असो आवर्जून कोकणात येतात.
कोकण रेल्वेला होत असलेली गर्दी व पावसामुळे बिघडणारे रेल्वेचे वेळापत्रक यामुळे एसटीचा प्रवास हा सुखकर व सोयीचा असल्यामुळे एसटीतून प्रवास करणे चाकरमानी पसंत करतात.
गेल्या वर्षी एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांत वाढ झाली होती. त्यामुळे या वर्षी एसटी प्रशासनाने मागील वर्षीपेक्षा अधिक जादा गाडया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी १३३१ गाडया सोडण्यात आल्या होत्या. या वर्षी १ हजार ४५० गाडया सोडण्यात येणार आहेत.
तसेच नियमित ७५ गाडया सोडण्यात येणार आहेत. त्यात दापोलीतून ७, खेडमधून ११, चिपळूणमधून १३, गुहागरमधून १३, देवरूखमधून ९, रत्नागिरीमधून ४, लांजामधून ५, राजापूरमधून २, मंडणगडमधून ११ गाडया सोडण्यात येणार आहेत. १२ ते २७ सप्टेंबपर्यंत या गाडया सोडण्यात येणार आहे. या वेळी १२ ऑगस्टपासून आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच ग्रुप आरक्षणासाठी ४ ऑगस्टपासून सुविधा उपलब्ध झाली आहे.
प्रवाशांचा सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी रात्रीच्या काळात गस्ती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. गस्ती पथकाच्या माध्यमातून एसटी गाडयांची तपासणी व चालकाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच नवीन चालकांना माहिती देणे, असे काम केले जाणार आहे. यात एक वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षक तसेच कर्मचारी असणार आहेत. कशेडी ते पाली आणि पाली ते खारेपाटण या दोन टप्प्यांत हे गस्तीपथक कार्यरत राहणार आहे

